Monday 3 September 2012

kadambari kadam-desai boltey

मी गोरेगाव विद्यामंदिर शाळेत शिकले. बालपणापासूनच अभ्यास करायला मला बिलकुल आवडायचे नाही. गणिताचा आणि माझा छत्तीसचा आकडा. गणिताची एवढी भीती वाटायची की, स्वप्नातदेखील गणितात नापास झाले की काय अशी भयानक स्वप्नं पडायची. त्यामुळे कॉलेजात गणिताचा पिच्छा सोडविण्यासाठी कला शाखेत प्रवेश 
घेतला. मला डान्स, वक्तृत्व, नाटक हे फार आवडायचे. त्यावेळी मला एकाच वेळी सर्व करायला हवं असं वाटायचं, पण देव जाणे अभ्यास नकोसा वाटायचा.
लहानपणी मी विजय तेंडुलकरांच्या ‘चिमणा बांधतो बंगला’ या नाटकात चिमणीचा रोल केला होता आणि या नाटकापासून मला चिमणीच नाव पडले ते कायम.
माझ्या धाकट्या भावाला मी त्याची ताई असून घाबरायचे. तो माझ्याहून पाच वर्षाने लहान, तरी घाबरायचे. भाऊच माझा बालपणीचा सर्वात जवळचा सवंगडी. आम्ही कितीही एकमेकांशी भांडलो तरी मित्र-मैत्रिणींनी शाळेत दिलेला खाऊदेखील एकमेकांसाठी उरवून घेऊन 

यायचो. लहानपणी त्यांच्यात आणि माझ्यात एक डील झाली होती. मला झुरळाची जाम भीती वाटायची आणि माझ्या भावाला पालीची भीती वाटायची. त्यामुळे घरात झुरळ दिसले तर त्याने घालयवाचे आणि पाल दिसली
तर मी घालवणार असं आम्ही सहमताने ठरवले होते. त्यामुळे अन्य बाबतीत दुमत असणारी आम्ही भावंडे याबाबतीत आम्ही क्रॉम्प्रोमाईज केले होते. होळीच्या दिवशी शाळेत सर्व मित्र-मैत्रिणींनी फुगे घेऊन यायचे आणि शाळेत ते भरायचे असे ठरले होते. मात्र याबाबत आमच्या शिक्षकांना याची कुणकुण लागली आणि फुग्यांची सर्वांच्या बॅगेत शोधमोहीम सुरू झाली. जेव्हा माझ्या बाई माझ्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, कादंबरी तुझ्या बॅगेत फुगे आहेत का? मी अगदी धडधडीत नाही बोलले. त्यानंतर त्यांनी मला पुन्हा सांगितले नक्की नाही ना की बॅग चेक करू? त्याक्षणी पोटात भीतीचा गोळा आला. मात्र तरीही मी हो करा बोलले, पण सुर्दैवाने त्यांनी माझी बॅग तपासलीच नाही आणि मी वाचले. मात्र मी सोडून माझे सर्व मित्र-मैत्रिणी पकडले गेले. बाप रे तेव्हा मी वाचले खरे, पण शाळा सुटल्यावर माझ्या सर्व मैत्रिणींनी सर्व फुगे मला मारले आणि त्या दिवशी मी त्यांची टार्गेट झाले.
त्यानंतर एकदा चित्रकलेचा तास होता आणि माझी बेस्ट फ्रेण्ड चित्रकलेची वहीच घरी विसरली. बाईंनी जेव्हा सार्‍यांच्या वह्या तपासल्या तेव्हा तिला वर्गाच्या बाहेर काढले. मात्र जेव्हा त्या माझ्याजवळ आल्या तेव्हा मी पण वही आणली नाही असं खोटे बोलले होते. मी वही आणली होती मात्र त्या दिवशी फक्त माझ्या मैत्रिणींसाठी वर्गाबाहेर उभे राहिले.
मला टीव्हीविषयी फार कौतुक वाटायचे. मी नेहमी त्या टीव्ही बॉक्सला न्याहाळायचे आणि मनात यायचे ही सर्व माणसे या बॉक्समध्ये कुठून बरं जात असावी? यामध्ये जाण्यासाठी काही शिड्या वगैरे आहेत का? असे माझ्या बालमनाला न सुटणारे प्रश्‍न पडायचे, पण आज मी त्याच टीव्ही बॉक्समध्ये दिसतेय. त्यामुळे आज ते सर्व प्रश्‍न आठवल्यावर अगदी हसू फुटतं की, बालपण किती निरागस असतं ना.



2 comments:

  1. Nice
    Story vachun lahanpanicha aathavni jaagya jhalya....

    ReplyDelete
  2. Absolutely... Me pan same School same batch.

    ReplyDelete