Google+ Followers

Monday, 3 September 2012

Priya Bapat Boltey

शाळेतल्या एखाद्या बाई आपल्या विद्यार्थ्यांचं आयुष्यच बदलून टाकतात किंबहुना त्यांना शाळेच्या वयातच आयुष्याची, करियरची दिशा मिळवून देतात. आजच्या अनेक सेलिब्रिटीजना घडवणार्या ‘बालमोहन’च्या विद्याताई पटवर्धन आणि त्यांची शिष्या सध्याची आघाडीची अभिनेत्री प्रिया बापट यांच्याविषयी… सचिन खेडेकर, अतुल परचुरे, केतकी थत्ते, प्रिया बापट यांच्या सारख्या अभिनेते – अभिनेत्रींना कोवळ्या वयात अभिनयाचे धडे देणार्या गुरु म्हणजे विद्याताई पटवर्धन. त्यांच्याविषयी बोलताना त्यांची शिष्या प्रिया बापट म्हणाली, मी पाहिलं नाटक विद्याताईंकडे केलं. पहिली मालिका ‘बंदिनी’ त्यांच्यामुळे केली, मला पहिला चित्रपट ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ त्यांच्यामुळे मिळाला, पहिली जाहिरात ‘चेतना सेल्फ स्टडी’ची त्यांच्यामुळे मिळाली आणि कुमार कला केंद्राचं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं पाहिलं बक्षिसंही त्यांच्यामुळेच मिळालं! मी आज जी काही आहे ती विद्याताईंमुळेच आहे. मी बालमोहन मध्ये शिकलेय. तिथे विद्याताई लहान मुलांची नाटकं बसवायच्या. मी लहानपणी बिल्डींग मधल्या नाटकांमध्ये काम करायचे पण अभिनयाच्या क्षेत्रात येईन असं कधीच वाटलं नव्हतं. एक दिवस घरी न विचारताच त्यांना जाऊन सांगितलं की मला पण नाटकात काम करायचंय. त्यांनी मला पहिल्यांदा नाटकात काम दिलं पण ते होतं फक्त एका विंगेतून दुसर्या विंगेत छत्री घेऊन जाण्याचं! तेव्हा मी खूप अपसेट झाले होते. खूप वाईटही वाटलं होतं. अर्थात नंतर मात्र आमची छान मैत्रीच झाली. त्या खरं म्हणजे आम्हाला चित्रकला शिकवायच्या पण चित्रकलेच्या बाई असण्यापेक्षा त्या आमच्या विद्याताईच जास्त आहेत. बालमोहनची मुलं खूप टारगट होती त्यामुळे त्या तालमीत खूप ओरडायच्या. नंतर भीती चेपल्यावर मात्र आमचं छान नातं निर्माण झालं. विद्याताईंचा हात अतिशय मऊ आणि प्रेमळ आहे. मी हक्काने त्यांना त्रास देते. त्यांचे गाल ओढते, साडीच्या पदराशी खेळते! शाळेत आमचं हक्काचं असं त्या एकच माणूस होत्या. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधीही बाहेरची नाटकं बसवली नाहीत. त्या नेहमी शाळेतल्या पाठय़पुस्तकांमध्ये जे धडे असत त्यांच्यावर आधारित नाटकंच बसवायच्या. हिंदी, मराठी दोन्ही भाषांमध्ये त्या असंच करायच्या. त्यामुळे आमचं नाटक, धडे, अभ्यास सगळंच एकदम व्हायचं. त्यांनी टिपिकल बालनाटय़ कधीच केली नाहीत. शाळेत असताना त्यांनी जे काम केलं ते खरंच महत्त्वाचं ठरलं कारण त्यामुळे आमचा नाटक आणि अभ्यास दोन्हींतला इंटरेस्ट कायम राहिला. आमच्या नाटकाच्या तालमी रात्री उशिरा पर्यंत चालायच्या पण त्यांनी कधीही असुरक्षित वाटू दिलं नाही. अगदी घरच्या इतकं सुरक्षित वातावरण तिथे असायचं आणि विद्याताई पण आई सारख्याच प्रेमळ वाटायच्या. प्रियाने तसा विद्याताईंचा फारसा ओरडा कधी खाल्ला नाही पण एक प्रसंग मात्र तिला अजूनही आठवतो. ती म्हणाली, बालमोहनचा सामोसा, वडा खूप प्रसिद्ध आहे. त्याचा सॉस पण युनिक असायचा. आम्ही जेव्हा स्पर्धांसाठी जायचो तेव्हा आम्हाला शाळे कडून वडा, सामोसा दिला जायचा. एकदा जवाहर बालभवनची स्पर्धा होती. त्यावेळी स्पर्धा सुरु व्हायच्या थोडंसं आधी विद्याताई साडी बदलून, छान ड्रायक्लीन केलेली साडी नेसून आल्या आणि आल्या आल्या मी चुकून त्यांच्या साडीवर अख्खी सॉसची पिशवी -जवळ जवळ सांबार इतका सॉस होता तो – सांडवली होती! त्यावेळी विद्याताईंकडून आयुष्यातला पहिला आणि शेवटचा ओरडा खाल्ला! त्यांना हे आठवतंय की नाही माहिती नाही पण माझ्या मात्र हा प्रसंग चांगलाच लक्षात आहे. अर्थात तेवढय़ा पुरतं त्या कधी चिडल्या – ओरडल्या तरी त्यांचा आमच्यावर राग कधीच नसायचा. पण आत्ता मी मात्र त्यांच्यावर रागावलेय कारण त्या माझ्या लग्नाला आल्या नाहीत! शिवाय त्यांनी अजून माझं ‘नवा गडी नवं राज्य’ हे नाटकसुद्धा बघितलं नाहीये! बाकी आमचं नातं खूप छान आहे. मी या क्षेत्रात काही करू शकते याची त्यांनी पहिल्यांदा जाणीव करून दिली म्हणूनच मी आजवर काही करू शकले. मध्यंतरी ‘मधली सुट्टी’च्या वेळी मला बोलावलं होतं त्यांच्याविषयी – शाळे विषयी सांगण्यासाठी. पण तेव्हा माझं शूटिंग असल्याने मी जाऊ शकले नव्हते. विद्याताईंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची आजपर्यंत फारशी संधी मिळाली नसल्याने आत्ताची ही संधी मात्र मला चुकवायची नव्हती. बालमोहनमध्ये शिकणार्या आजचे विद्यार्थी विद्याताई आता तिथे शिकवत नसल्यामुळे खूप काही मिस करतायत! त्या एक फ्रेंडली गुरु आहेत असं एका वाक्यात त्यांच्या विषयी सांगता येईल! विद्याताई आपल्या या गुणी शिष्येविषयी अगदी भरभरून बोलत होत्या. त्या म्हणाल्या, बालमोहनमध्ये असताना प्रिया आवाज चांगला असल्याने गाण्याच्या ग्रुपमध्ये होती. गाण्याच्या आणि आमच्या नाटकाच्या तालमी एकाच हॉलमध्ये होत असल्याने मी तिला त्या ग्रुपमध्ये पाहिलं होतं. ती छान गायची, दिसायलाही छान होती पण बडबड खूप करायची. मी नेहमी तिला सांगते की आता तू चांगलं नाव मिळवलं आहेस, भरपूर काम तुझ्याकडे आहे त्यामुळे बोलण्यात एनर्जी वाया घालवण्यापेक्षा ती कामासाठी शिल्लक ठेव! तिच्या छान चेहर्यामुळे मी तिला नाटकात यायला सांगितलं. ती माझ्या ‘दे धमाल’ या सिरीयल मध्ये होती. मग तिला ‘मुन्नाभाई’ साठी विचारलं गेलं. त्यावेळी तिचे आई-वडील जरा साशंक होते हिंदी चित्रपटात काम करण्याविषयी आणि एकूणच या क्षेत्रातल्या करियरविषयी. पण मी त्यांना समजावलं. ‘मुन्नाभाई’ साठी प्रियाचं मानधन ठरवायलासुद्धा मीच गेले होते! प्रियाच्या घरचं वातावरण अगदी साधंसुधं होतं. त्यामुळे तिच्यासारखी एक मध्यमवर्गीय मुलगी आता इतकी पुढे गेली आहे, स्वतःची गाडी तिने घेतली आहे याचा मला खूप आनंद होतो आणि अभिमानही वाटतो. अजूनही रस्त्यात कधी ती भेटली तर गाडी थांबवून मला लिफ्ट देते. ‘तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे’ असं म्हणते! प्रिया शाळेत असताना अभ्यासातही चांगली होती. आमचं नातं गुरु – शिष्याचं असलं तरीही ते जास्त मैत्रीपूर्ण आणि हक्काचं आहे. ‘दे धमाल’च्यावेळीही त्यातल्या कलाकार मुलांची कधी भांडणं झाली तर मी तिची बाजू घ्यावी असं तिला वाटायचं. तिची मतं ठाम असतात ही तिच्यातली गोष्ट मला खूप आवडते. ती इतकी नावारूपाला आली असली तरी अगदी साधी आहे. या क्षेत्रात आपला साधेपणा टिकवून ठेवणं ही तशी कठीण गोष्ट आहे. पण प्रिया कधीही खोटं वागत नाही. पहिल्यांदा भेटली होती तशीच आजही वाटते इतकी ती खरी आहे. ती मेक-अपच्या आड स्वतःला लपवत नाही. त्यामुळे जेव्हा भेटते तेव्हा ‘ती’च भेटते. तिचा कपडय़ांचा सेन्स खूप चांगला आहे. ती फार नटत नाही. साधी पण आकर्षक दिसते. शाळेच्या कार्यक्रमाला कधी बोलावलं की आवर्जून वेळात वेळ काढून येते. तिचा करियर ग्राफ वाढतो आहे याचा मला खूप आनंद आहे. तिचं नवीन प्रोजेक्ट बघितलं की आमच्यात त्याविषयी चर्चा होतेच. अजून तिचं ‘नवा गडी नवं राज्य’ हे नाटक आणि आता नुकताच आलेला ‘काकस्पर्श’ ही मला बघायचाय. कमर्शियल मध्ये गेलेले माझे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यात प्रियाचं चांगलं नाव आहे आणि आमचे आजही अगदी जिव्हाळ्याचे घरगुती संबंध आहेत. त्यामुळे तिच्या प्रगतीच्या बाबतीत मी खूपच समाधानी आहे. संपूर्ण आयुष्यावर प्रभाव टाकतील असे शिक्षक किंवा गुरु शाळेच्या वयातच मिळणं ही खरंच भाग्याची गोष्ट. विद्याताईंच्या रूपाने बालमोहन मध्ये तेव्हा शिकणार्या अनेक विद्यार्थ्यांना ते भाग्य मिळालंय ही खरंच मोठी गोष्ट आहे!

No comments:

Post a Comment